तेल्हारा येथे 18 तास अभ्यास करून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली
तेल्हारा- सूरज इंगोले
तेल्हारा येथील स्थानिक मिलिंद नगर मध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने 18 तास अभ्यासाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या वीस वर्षापासून शहरातील ही परंपरा याही वर्षी कायम राखून शेकडो विद्यार्थ्यांनी या *21 व्या वर्षी* सुद्धा 18 तास अभ्यास करून घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने त्यांना आगळीवेगळी अशी आदरांजली वाहली.
5 डिसेंबर गुरुवार रोजी दुपारी ठीक साडेअकरा वाजता आधी सामूहिक त्रिशरण-पंचशील भिमस्तुती घेऊन भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून दुपारी ठीक बारा वाजता अभ्यासाला सुरुवात करण्यात आली यामध्ये तेल्हारा शहरातील अनेक परिसरातील विद्यार्थ्यांसोबतच गाडेगाव, थार, शेरी, माळेगाव, वाकोडी, कोठा रायखेड इत्यादी तेल्हारा शहराच्या आजूबाजूच्या अनेक खेड्यातून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे सान बालकांपासून ते तरुण युवकांपर्यंत सर्वांनी 18 तास अभ्यास करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली. सामाजिक बांधिलकीची जाणीव असणारे अनेक महानुभावांनी या उपक्रमाला भेट देऊन सहभागी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य सोबतच त्यांच्या अल्पोपहारासाठी लागणारे साहित्य भेट देऊन सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रेरित केले. यामध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी ग्रंथालय संचालक आयु. गणेशजी तायडे यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती पद्मावती तायडे, वंचित बहुजन आघाडीचे माजी शहराध्यक्ष आयु. विकास पवार, नगरपरिषद शाळेचे मुख्याध्यापक आयु. सिद्धार्थ तायडे सर, प्रा. प्रशांत पवार सर, तेल्हारा तहसीलचे आयु. नंदकिशोर पचांग, फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचे सुविख्यात वक्ते आयु. भिमराव परघरमोर सर, ह्या सर्वांनी उपस्थित विद्यार्थ्यांना भेट देऊन त्यांचा उत्साह वाढवला.
दरम्यान सहभागी सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार तसेच चहापान देण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी ठीक 7:30 वा सहभागी विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. त्यानंतर भगवान बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूजन करून सामूहिक वंदना घेण्यात आली. ह्या वेळी परिसरातील अनेक उपासक उपासिका बहुसंख्येने उपस्थित होते. बाबासाहेबांना साश्रू नयनांनी मानवंदना देऊन या उपक्रमाची सांगता झाली.
वीस वर्षांपूर्वी शहरातील सुगतानंद संघाने या उपक्रमाची सुरुवात केली होती. त्यानंतर गेल्या वीस वर्षापासून हा उपक्रम तेल्हाराच्या परिसरात अखंडितपणे सुरू असून दरवर्षी यामधील सहभागी विद्यार्थ्यांची संख्या वाढतच आहे. या 21 व्या वर्षी सुद्धा हा उपक्रम यशस्वीरित्या राबवून परिसरातील आंबेडकरी जनतेने या अभिनव उपक्रमाची परंपरा अखंडित राखली.
या उपक्रमाचे समाजाच्या अनेक स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. आयुष्यभर ज्ञानाची साधना करणारे महान ज्ञानयोगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना हार फुलांपेक्षाही अभ्यास करून दिली जाणारी हे श्रद्धांजली खऱ्या अर्थाने सार्थ ठरते. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागून बाबासाहेबांचा विचार त्यांच्या मनात खोलवर रुजतो.
या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी मिलिंद मंडळातील दिपेंद्र वानखडे, विजेंद्र वानखडे, सिद्धार्थ पोहरकार, गौतम पोहरकार, अजय हिवराळे, कुंदन हिवराळे, आदित्य बोदडे, कुणाल बोदडे, विशाल बोदडे, सतीश वानखडे, रोशन दारोकार, रोहित तायडे, मयूर पोहरकार, अभिजीत तायडे, रोहन तायडे, प्रतीक तायडे, संदीप तायडे, मंगेश तायडे, प्रशांत तायडे, दर्शन बोदडे, गौरव इंगळे तसेच परिसरातील सर्व युवकांनी अथक परिश्रम घेतले.